कृषि परिषदेचे उपाध्यक्ष व महासंचालक यांची गणेशखिंड येथील विभागीय कृषि संशोधन केंद्रास भेट
राहुरी विद्यापीठ, दि. 14 डिसेंबर, 2024 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या गणेशखिंड जि. पुणे येथील विभागीय कृषि संशोधन केंद्रास महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष मा. श्री. तुषार पवार यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी पेशवेकालीन आंबा, फणस, काजू या फळबागांची तसेच फुले आणि भाजीपाला सुधार प्रकल्प, रोपवाटिका, माळी प्रशिक्षण वर्ग आणि जैवविविधता प्रक्षेत्र यांची पाहणी केली व संशोधकांशी चर्चा केली. या भेटीदरम्यान श्री. तुषार पवार यांचे शुभहस्ते रोपवाटिकेत वृक्षारोपण करून माळी प्रशिक्षण वर्गाच्या नवीन इमारतीची पाहणी केली. या भेटीदरम्यान विभागीय कृषि संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. विष्णू गरंडे यांनी जैवविविधतेचे संवर्धन तसेच केंद्रावर चालू असणारे नवीन संशोधन व केंद्रावर असणाऱ्या सुविधा याबाबत माहिती दिली. यावेळी मा. श्री. तुषार पवार यांनी संशोधन केंद्रावर गरजेच्या असणाऱ्या प्रशासकीय इमारत, शेतकरी, विद्यार्थी यांच्यासाठी सुसज्ज सेमिनार हॉल तसेच कर्मचारी वसाहत यांच्या बांधकाम व नूतनीकरणाबद्दल सकारात्मक प्रतिसाद आणि निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी विभागीय कृषि संशोधन प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दुपारच्या सत्रात कृषि आयुक्त व महाराष्ट्र राज्य कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक श्री. रावसाहेब भागडे यांनी विभागीय कृषि संशोधन केंद्रास सदिच्छा भेट देऊन केंद्राच्या संशोधनाचा आढावा घेतला व विकास कामांची पाहणी केली. या भेटीदरम्यान सहयोगी संशोधन संचालक डॉ. विष्णू गरंडे यांनी प्रकल्पामध्ये चालू असलेले संशोधनाची माहिती दिली. यावेळी श्री. भागडे यांनी गणेशखिंड येथील जैवविविधता प्रक्षेत्रावरील विविध वनस्पतींची माहिती घेऊन पेशवेकालीन आंब्याच्या झाडाची पाहणी केली. यावेळी कृषि परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर तसेच विभागीय कृषि संशोधन प्रकल्पातील डॉ. दत्तात्रय लाड, डॉ. सतीश जाधव व डॉ. सुनील लोहाटे उपस्थित होते.