अहिल्यानगर दि. ८ डिसेंबर – पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत जलसंधारणाची विविध कामे केल्याने शाश्वत जलसाठा उपलब्ध झाला असून फळबागांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. करंजी हे बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखले जाते. दिवसभरात दहा ते पंधरा हजार प्रवासी गावात ये-जा करतात. त्यामुळे गावकऱ्यांसोबत या प्रवाशांसाठीदेखील पिण्याचे पाणी आवश्यक असते. गावात फळबागांचे प्रमाणही अधिक अर्थात एकूण पिकांच्या ७५ टक्के आहे. या फळबागांसाठीदेखील मुबलक प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते.
पाण्याचे योग्य नियोजन करण्यासोबत पाणीसाठ्यात वाढ करण्याची आवश्यकता लक्षात घेवून गावाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योनजेअंतर्गत जलसंवर्धनाची विविध कामे हाती घेतली. जलस्रोतांमधील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात आला आणि आवश्यक तिथे दुरूस्तीची कामे करण्यात आली. गाळ काढून परिसरातील शेतात टाकण्यात आल्याने शेतीसाठी त्याचा फायदा झाला. गावात पाणलोट विकास समितीमार्फत ४ ठिकाणी सिमेंट नाला बांध दुरुस्ती आणि १९ सामुहीक शेततलावाची कामे घेण्यात आली. याशिवाय ३ मातीनाला बांध, ८ चेक डॅम, समतल चर, संयुक्त गॅबियन, सलग समतल चर अशी ३९ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांवर १ कोटी ३४ लाख रुपये खर्च करण्यात आले. या सर्व कामांमुळे गावातील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली.
गावाला आता पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. पिण्यासाठी आणि सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. एवढ्यावर समाधान न मानता जलसंधारणाची आणखी कामे घेण्याचा ग्रामस्थांचा निर्धार आहे. एकूणच गावात जलसंवर्धनाचे नवे पर्व सुरू झाले आहे. रफिक शेख, सरपंच-एरवी पावसाळ्यानंतर दोन ते तीन महिन्यात विहिरींचे पाणी अटत असे. यावर्षी मात्र विहिरींना चांगल्या प्रमाणात पाणी असल्याने फळबागांना पुरेसे पाणी मिळते आहे. पाण्यामुळे इतरही परिसर बहरला आहे. गावात असणाऱ्या प्रत्येक बंधाऱ्यातील गाळ काढण्यासोबत जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत विविध कामे घ्यायची आहेत.