अहिल्यानगर दि. ३- पीकविमा, पीककर्ज, नैसर्गिक आपत्ती, एमएसपी अंतर्गत पिकांची नोंद, ॲग्रीस्टीक अंतर्गत सर्व योजना तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ठराविक मुदतीमध्ये ई-पीकपाहणी करुन घेण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) शारदा जाधव यांनी केले आहे.
महाराष्ट्रात १ डिसेंबर २०२४ पासून रब्बी हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना यापूर्वी पीक पाहणीसाठी ई-पीक पाहणी मोबाईल ॲप उपलब्ध होते. परंतू केंद्र शासनाच्या सुचनेप्रमाणे यामध्ये तांत्रिक बदल करत डिजिटल क्रॉप सर्वे (डीसीएस) मोबाईल ॲप उपलब्ध करुन देण्यात आले असून याच ॲपच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात ई-पीक पाहणी होणार आहे. शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणी करण्यासाठी १ डिसेंबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५ ही मुदत असून सहायक स्तरावर ई-पीक पाहणी करण्यासाठी १६ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ ही मुदत आहे.
शेतकरी स्तरावरुन मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी नोंद करण्यात येऊन शेतकरी स्तरावरील कालावधी संपल्यानंतर सहायकांमार्फत उर्वरित शेतकऱ्यांची पीक पाहणी ॲपद्वारे नोंदविण्यात येते. शेतकऱ्यांच्या पीक पाहणी मदतीसाठी हंगाम सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून सहायक उपलब्ध आहे. डिजिटल क्रॉप सर्वे (डीसीएस) मध्ये गटाच्या हद्दीवर आधारित जीओ फेन्सिंग बंधनकारक करण्यात आलेली आहे. जोपर्यंत संबंधित खातेदार, सहायक निवडलेल्या गटात जाऊन पीक पाहणी करत नाही तोपर्यंत पिकांचे छायाचित्र काढता येत नाही व पीक पाहणी अपलोड करता येत नसल्याचेही कळविण्यात आले आहे.