राहुरी कृषि विद्यापीठात आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धेची सुरुवात
मैदानावर स्पर्धेबरोबरच खिलाडूवृत्ती हवी –अधिष्ठाता (कृषि) डॉ. दिलीप पवार
राहुरी विद्यापीठ, दि. २७ ऑक्टोबर, २०२४ स्पर्धा खेळण्यासाठी मैदानावर उतरल्यानंतर स्पर्धेबरोबरच नवीन मित्र जोडा. तुमची खेळातील उच्च क्षमता गाठण्यासाठी प्रयत्न करा परंतु यामध्ये अपयश आले तर मनामध्ये खंत बाळगू नका. विजेत्या खेळाडूविषयी मनामध्ये राग न धरता खिलाडूवृत्ती दाखवा तरच मिळालेल्या यशाचा आनंद तुम्हाला साजरा करता येईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषि) डॉ. दिलीप पवार यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने विद्यापीठातील क्रीडा भवनात या आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मैदानी स्पर्धेचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सचिन नलावडे, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, राष्ट्रीय योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.महावीरसिंग चौहान, क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी, माजी विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.शरद पाटील, माजी क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड, प्रसारण केंद्राचे प्रमुख डॉ. पंडित खर्डे, पदव्युत्तर महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण निर्देशक डॉ. बाबासाहेब भिंगारदे, एनसीसीचे अधिकारी डॉ. सुनील फुलसावंगे व डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव तथा शारीरिक शिक्षण निदेशक श्री. वैभव बारटक्के उपस्थित होते. दि. २७ व २८ ऑक्टोबर या दोन दिवस होणाऱ्या या मैदानी स्पर्धेमध्ये लांब उडी, उंच उडी, ट्रिपल जंप, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, धावणे व रीले इत्यादी क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होणार आहेत.
यावेळी सकाळच्या सत्रात झालेल्या ५००० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे व भालाफेक या स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. यामध्ये ५००० मीटर धावणे या पुरुषांच्या स्पर्धेत सुवर्णपदक बारामती महाविद्यालयाचा विद्यार्थी ओम पिंपळे याला तर सिल्वर पदक पुणे कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिश राऊत याला तर कास्य पदक दोंडाईचा कॉलेजचा विद्यार्थी सिताराम पाडवी याने पटकावले. ८०० मीटर मुलींच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये बारामतीच्या प्रतीक्षा माळशिकारे हिने सुवर्णपदक, येवला कृषी महाविद्यालयाच्या हर्षाली महाले हिला सिल्वर पदक तर जयनापुर कृषि महाविद्यालयाच्या प्रगती करणाळे या विद्यार्थिनीने कांस्यपदक पटकावले. भालाफेक स्पर्धेमध्ये बारामती कृषि महाविद्यालयाची वैष्णवी नरुटे हिने सुवर्णपदक तर धुळे कृषि महाविद्यालयाची विद्यार्थिनी वृंदा गंजुरे हिला सिल्वर पदक तर पुणे कृषि महाविद्यालयाची तनुजा फाटे या विद्यार्थिनीने कास्यपदक मिळविले.
या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सचिन नलावडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विक्रम कड यांनी तर आभार श्री. वैभव बारटक्के यांनी मानले. या मैदानी स्पर्धेसाठी २७ कृषि महाविद्यालयातील ३७ संघ व्यवस्थापकांसह २० पंच, २९१ मुले व २०० मुली असे एकूण ४९१ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या उद्घाटन कार्यक्रमासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.