कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष प्रयत्न करा-जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
अहिल्यानगर दि.26-विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. संपूर्ण निवडणूक प्रक्रीया पारदर्शक राहील याकडेही लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
विधानसभा निवडणुकीबाबत दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, निवडणूक निर्णय अधिकारी, समन्वयक अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, संपूर्ण निवडणुक कालावधीत शांतता व सुव्यवस्था रहावी यादृष्टीने पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवावा. निवडणूक विषयक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, यात कुणालाही सूट देवू नये. कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवावे. आनंददायी मतदान केंद्र असावे अशा निवडणूक आयोगाच्या सूचना असल्याने त्यादृष्टीने मतदारांसाठी किमान सुविधा कराव्यात.
मनुष्यबळ आणि ईव्हीएम यंत्राच्या दुसऱ्या सरमिसळचे नियोजन करावे. 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण आयोजित करावे, तसेच मतमोजणी कर्मचाऱ्यांसाठीही प्रशिक्षण आयोजित करावे. मतदान कर्मचाऱ्यांच्या सुविधेबाबतही नियोजन करावे. मतदानाच्यावेळी वेबकास्टींगची सुविधा करण्यासाठी आतापासून नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
श्री.महाजन यांनी आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या. यावेळी टपाली मदतान प्रक्रीयेबाबत आढावा घेण्यात आला.