मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना : उद्योजकांनी व उमेदवारांनी मोठ्या संख्येने नोंदणी करावी प्रभारी जिल्हाधिकारी सुहास मापारी
अहमदनगर – युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी शासनाने “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” सुरु करण्यास मान्यता दिली आहे. शासनाच्या या फ्लॅगशीप योजनेचा लाभ घेण्यासाठी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उद्योजकांनी व उमेदवारांनी मोठ्या संख्येने नोंदणी करण्याचे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
जिल्ह्यातील युवक आपले शिक्षण पुर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी, व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधीत अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरु करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दुव्यांचा अभाव असल्याकारणाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थीना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेंअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. यामध्ये १२ वी पास युवकांना ६ हजार रुपये, आय.टी.आय, पदविका प्राप्त युवकांना ८ हजार रुपये तर पदवीधर, पदव्युत्तर युवकांना १० हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे.