जबलपुर येथे सौर उर्जा सिंचन योजनेच्या प्रशिक्षणासाठी शास्त्रज्ञ, कर्मचारी महिला व शेतकरी महिला रवाना
राहुरी विद्यापीठ, दि. 8 जुलै, 2024 महात्मा फुले कृषि विद्यापीठातर्फे शास्त्रज्ञ व शेतकर्यांसाठी सौर उर्जा सिंचन योजना या विषयावर तीन दिवसांच्या क्षमता विकास प्रशिक्षणासाठी जबलपुर-मध्यप्रदेश येथे बोरलॉग इंन्स्टिट्युट ऑफ साउथ एशिया (बीसा) या संस्थेत 25 शास्त्रज्ञ, कर्मचारी महिला व 12 शेतकरी महिला असे एकुण 37 प्रशिक्षणार्थींची तिसरी तुकडी रवाना झाली आहे. या तीन दिवसाच्या प्रशिक्षणात बोरलॉग इन्स्टिट्युटचे प्रकल्प समन्वयक श्री. महेश मस्के, प्रशिक्षण तज्ञ श्री. ललीत शर्मा, डॉ. प्रभात कनुजे आणि डॉ. विवेक सिंग हे प्रशिक्षण देणार आहेत. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे सुचनेनुसार व माजी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील शास्त्रज्ञ व शेतकरी यांच्यासाठी सदरील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रशिक्षणासाठी जाणार्या या तिसर्या तुकडीच्या बसला कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी निरोप दिला. यावेळी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, माजी संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, कृषि अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख व आंतरविद्याशाखा जलव्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. मुकुंद शिंदे व संशोधन उपसंचालक डॉ. पांडुरंग शेंडगे उपस्थित होते. यावेळी डॉ. विठ्ठल शिर्के म्हणाले की या प्रशिक्षणामध्ये सहभागी होणार्या कर्मचारी तसेच शेतकरी महिलांना या प्रशिक्षणाचा फायदा त्यांच्या शेतीमध्ये सोलर सिस्टीमचे युनिट बसविण्यासाठी महत्वाचा ठरु शकतो. डॉ. सुनील गोरंटीवार आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की शेतकरी महिलांनी या प्रशिक्षणाचा फायदा जास्तीत जास्त कसा होईल ते पहावे. त्यांना सोलर सिस्टीमसाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होईल. या कार्यक्रमाप्रसंगी या प्रकल्पातील संशोधन सहयोगी डॉ. शुभांगी घाडगे उपस्थित होत्या.