लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी घेतला आढावा
व्हिजन 24 न्यूज
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी घेतला आढावा
अहमदनगर दि. 3 एप्रिल :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीमध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला.
बैठकीस अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री सालीमठ म्हणाले की, लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने प्रत्येक सहायक निवडणूक अधिकारी स्तरावर आदर्श आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. या कक्षामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोपविण्यात आलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडावी. नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना आदर्श आचारसंहितेबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. निवडणुकीदरम्यान आदर्श आचार संहितेची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी दिले.
निवडणुकीसाठी विविध भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकामार्फतही चोवीस तास तपासणी करण्यात यावी. पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही आवश्यकतेनुसार प्रशिक्षणाची सोय करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी दिल्या.
येत्या 7 तारखेपासुन निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाभरात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा मसुदा समान रहावा यासाठी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी तयार केलेल्या विस्तृत अशा प्रशिक्षण व्हिडीओचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी कर्मचारी प्रशिक्षण, मनुष्यबळ व्यवस्थापन, ईडीसी, पोस्टल बॅलेट पेपर, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्यासाठी मतदान सुविधा, वाहतुक व्यवस्था, यासह इतर विषयांचा विस्तृतपणे आढावा घेतला.
या बैठकीस सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.