कचरा संकलन गाड्यांचा उपयोग गावाच्या स्वच्छतेसाठी करावा -खासदार डॉ. सुजय विखे पाटील
व्हिजन 24 न्यूज
कचरा संकलन गाड्यांचा उपयोग गावाच्या स्वच्छतेसाठी करावा –खासदार डॉ. सुजय विखे पाटील
अहमदनगर दि. 25 फेब्रुवारी -जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून उपलब्ध करून देण्यात आलेल्या इलेक्ट्रिक कचरा संकलन गाड्यांचा उपयोग गाव स्वछ व सुंदर करण्यासाठी करावा, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
भिस्तबाग महल शेजारील मैदानात सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवात उमेद अभियानांतर्गत बचतगटांना विविध कर्ज तसेच लाभाचे वाटप व जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत 207 ग्रामपंचायतींना इलेक्ट्रिक घंटागाड्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात खासदार डॉ.विखे पाटील बोलत होते.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदींची उपस्थिती होती.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत बनविण्याचे स्वप्न पाहिले असून त्यासाठी स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेत कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांसाठी निधीची तरतूद करण्यात आली. १० कोटी रुपयांच्या माध्यमातून जिल्ह्यातील २०७ गावांना या इलेक्ट्रिक कचरा संकलन गाड्यांचे वाटप करण्यात येत आहे. आपले गाव स्वछ व सुंदर होण्याबरोबरच आपला भारत देश स्वच्छ व्हावा यासाठी या गाड्यांचा पूर्णपणे वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
महिलांच्या सक्षमीकरणाला शासनमार्फत सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. बचतगटांच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील महिलांना एकत्रित करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करत समाजात सन्मानाने जगण्यासाठी महिला रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत आहे. बचत गटातील महिलांना रोजगार मिळावा यासाठी विविध व्यवसाय करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 40 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले असून पुढील वर्षात बचतगटांसाठी 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 56 महिला बचतगटांना फूड प्रोसेसिंग युनिट बरोबरच स्टॉलही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जनमानसाच्या जीवनात बदल घडविण्यासाठी गावात विविध विकास कामांसाठी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचा उपयोग करावा, असे आवाहनही डॉ. विखे पाटील यांनी यावेळी केले.
जिल्ह्यात अधिकाधिक उद्योग येऊन तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात एमआयडीसीच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात जमीन औद्योगिक मंडळाकडे वर्ग करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात या ठिकाणी अनेक मोठं मोठे उद्योग येऊन अधिक प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास व्यक्त करत 200 कंपन्यांचा सहभाग असलेल्या नाशिक विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे 28 व 29 फेब्रुवारी रोजी याच ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. विभागातील तरुणांनी मोठ्या संख्येने या महामेळाव्यात सहभाग नोंदविण्याचे आवाहनही खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी केले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले म्हणाले की, शासनामार्फत महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात येत आहे.उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात कर्जाचे वितरण करण्यात येत आहे. गावामध्ये स्वच्छता रहावी यासाठी कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांचे वितरणही करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, ग्रामीण भागाच्या तसेच महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे.जिल्हा वार्षिक योजेतून 500 पेक्षा अधिक बचतगटांना विविध व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्रामीण भागाच्या स्वच्छतेसाठी ग्रामपंचातीना 350 कचरा संकलन गाड्यांचे वितरण करण्यात आले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी जिल्हयातील 207 ग्रामपंचायतींना इलेक्ट्रिक घंटागाड्यांचे तसेच बचतगटांना विविध लाभ व कर्जाचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती