पुणे येथील एनसीडीसी विभागीय कार्यालयाचे उपसंचालक गणेश गायकवाड यांची अर्बन बॅंकेचे अवसायक म्हणून नियुक्ती
व्हिजन 24 न्यूज
अहमदनगर :-अहमदनगर अर्बन सहकारी बँकेच्या अवसायकपदावर पुणे येथील एनसीडीसी कार्यालय उप संचालक गणेश गायकवाड यांचीह नियुक्ती एक वर्षासाठी करण्यात आली. केंद्रीय निबंधक विजयकुमार यांनी आदेश दि. 8 नोव्हेंबर रोजी अर्बन बॅंकेला जारी केले आहेत, अशी माहिती बॅंकेचे जागृत सभासद राजेंद्र चोपडा यांनी दिली.
चोपडा म्हणाले, रिझर्व्ह बॅंकेने बॅंकिंग परवाना रद्द केल्यानंतर नियमानुसार बॅंकेवर अवसायक नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन अध्यक्ष माजी खासदार कै.दिलीप गांधी, त्यांचे सहकारी संचालक तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरकारभारामुळे आणि भ्रष्टाचारामुळे शतकोत्तर परंपरा असलेल्या बॅंकेवर ही नामुष्की ओढवली आहे.
आता अवसायकांकडून बोगस कर्जाच्या थकबाकी वसुलीसाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडून भ्रष्टाचार करणाऱ्या तत्कालीन संचालकांवर कारवाई सुरू होणार आहे. केंद्र सरकारच्या अर्थ विभागात रिझर्व्ह बॅंकेच्या बॅंकिंग परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. या सर्व प्रकरणाची 15 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन सुनावणी होणार आहे. या सुनावणीत होणारा निकाल ठेवीदार, सभासद, कर्मचारी आणि बॅंकेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा ठरणार आहे. 30 सप्टेंबर 2023 अखेर बॅंकेला येणे असलेली थकबाकी 820 कोटी रुपये आहे. हेच खरे वास्तव आहे.