कृषीराहुरी

पिकांचे नविन वाण विकसीत करण्यासाठी शास्त्रज्ञांना अद्ययावत तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल- संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के

व्हिजन 24 न्यूज

पिकांचे नविन वाण विकसीत करण्यासाठी शास्त्रज्ञांना अद्ययावत तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल- संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के

राहुरी विद्यापीठ, दि. 2 डिसेंबर, 2024 सन 2050 मध्ये वाढलेल्या लोकसंख्येला आवश्यक असलेल्या अन्नधान्ये, फळे व भाजीपाल्याची गरज भागविण्यासाठी फिल्ड स्पेक्ट्रोस्कोपी, हायपर स्पेक्ट्रल व मल्टीस्पेक्ट्रल या अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने तयार केलेले हे तंत्रज्ञान निश्चितच आदर्शवत असे आहे. विविध पिकांचे सुधारीत वाण विकसीत करण्यासाठी शास्त्रज्ञांना या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन पिकांचे दुर्लक्षीत मौलीक गुणधर्म, पौष्टीक अन्नदव्ये या घटकांसाठी होऊ शकतो. अशाप्रकारे पिकांचे नविन वाण विकसीत करण्यासाठी शास्त्रज्ञांना अद्ययावत तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील सेंटर ऑफ एक्सलन्स अद्ययावत व काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञान या प्रकल्पाने दि. 2 ते 6 डिसेंबर, 2024 दरम्यान आयोजीत केलेल्या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. विठ्ठल शिर्के अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. याप्रसंगी माजी संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, माजी कुलसचिव डॉ. मुकुंद शिंदे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजु अमोलिक, कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनील कदम व वरिष्ठ कापूस पैदासकार डॉ. पवन कुलवाल उपस्थित होते.

यावेळी डॉ. सुनील गोरंटीवार मार्गदर्शन करतांना म्हणाले की अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती होणे हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. फिल्ड स्पेक्ट्रोस्कोपी, हायपर स्पेक्ट्रल व मल्टीस्पेक्ट्रल या विषयावरील प्रशिक्षणांचे आयोजन हे विद्यापीठाने वनस्पतीशास्त्र, मृदशास्त्र, वनस्पतीरोगशास्त्र व पाणी व्यवस्थापन या विभागांच्या मदतीने राष्ट्रीय पातळीवर आयोजीत केली पाहिजेत. हे तंत्रज्ञान प्रयोगशाळेपुरते मर्यादित न राहता शेतकर्यांच्या शेतावर गेले पाहिजे. डॉ. मुकुंद शिंदे यांनी कास्ट प्रकल्पांतर्गत वेगवेगळ्या विषयांवरील आयोजीत केलेल्या प्रशिक्षणांचा आढावा संक्षिप्त स्वरुपात सादर केला. यावेळी ते म्हणाले की संशोधनातील अलिकडील काळातील ट्रेडंस्वर आधारीत प्रशिक्षणाचे आयोजन करणे गरजेचे आहे. प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षणाचा फायदा घेवून पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी विषय द्यावेत. डॉ. विजू अमोलिक यांनी या प्रशिक्षणाचा उपयोग विविध पीक पैदासकारांना प्रत्यक्ष शेतावर व प्रयोगशाळेत संशोधनासाठी होईल असे सांगितले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. सुनील कदम यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्पाचे संशोधन सहयोगी डॉ. वैभव मालूंजकर यांनी तर आभार डॉ. पवन कुलवाल यांनी मानले. या प्रशिक्षणासाठी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील शास्त्रज्ञ, अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
×