बियाणे विभाग शास्त्रज्ञांच्या धुळे विभागातील विविध बिजोत्पादन संशोधन केंद्राना भेटी
राहुरी विद्यापीठ: (व्हिजन 24 न्यूज) – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी कार्यक्षेत्राच्या धुळे विभागातील धुळे, जळगाव, नंदुरबार येथील विविध संशोधन केंद्रांना बियाणे विभागाच्या शास्त्रज्ञांनी खरीप हंगामातील सोयाबीन बिजोत्पादन बियाणांची प्रत्यक्ष प्रक्षेत्र व गोडाऊनमध्ये पाहणी करून बीजोत्पादनाची गुणवत्ता, दर्जा कायम राहण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित केंद्रातील शास्त्रज्ञांना केल्या. विद्यापीठाच्या खरीप आढावा व रब्बी नियोजन बैठकीत आदरणीय कुलगुरू कर्नल डॉ. पी.जी.पाटील यांनी सूचना केल्याप्रमाणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संशोधन केंद्रांना बिजोत्पादन संबंधित आवश्यक संसाधने बाबत योग्य ती पाहणी करून त्याप्रमाणे कोणत्या ठिकाणी काय करण्याची गरज आहे याबाबतचा अहवाल बियाणे विभागाच्या अधिकाऱ्यांना सादर करण्यास सांगितले होते.
त्यानुसार संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली बियाणे विभागाचे प्रमुख डॉ. नितीन दानवले बीजोत्पादन अधिकारी डॉ. के. सी. गागरे यांनी धुळे येथील कृषी तंत्र विद्यालय, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालयातील कृषी विद्या, वनस्पतीशास्त्र, विभागास तसेच जळगाव येथील कृषी तंत्र विद्यालय, तेलबिया संशोधन केंद्र, केळी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र व नंदुरबार कृषी महाविद्यालय या ठिकाणी पाहणी करून संशोधन केंद्रांच्या शास्त्रज्ञांशी त्याबाबत विस्तृत चर्चा करून आपल्या संशोधन केंद्रास बीजोत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक पाण्याच्या उपलब्धतेसाठी तसेच काढणीनंतर बियाणे मळणी व साठवणूक गृहाचे प्रस्ताव तयार करून मा. कुलगुरू महोदय यांचेकडे एकत्रितरित्या सादर करण्यासाठी ते बियाणे विभागाकडे जमा करण्यास सांगितले.