राज्यस्तरीय युवक महोत्सव इंद्रधनुष्य 2024 स्पर्धेत महात्मा फुले कृषि विद्यापीठाला सुयश
राहुरी विद्यापीठ, दि. 11 नोव्हेंबर, 2024 कृषि डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे दि 7-11 नोव्हेंबर, 2024 या कालावधीत पार पडलेल्या राजभवन मुंबई संकल्पित राज्यस्तरीय युवक महोत्सव इंद्रधनुष्य 2024 या सांस्कृतिक स्पर्धेत राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या संघाला तीन पारितोषिक जाहीर झाले असल्याची माहिती विद्यापीठाचे संचालक राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याण डॉ. महावीरसिंग चौहान यांनी दिली आहे. यात श्री. क्षितीज जाधव यास ऑन दि स्पॉट फोटोग्राफीसाठी द्वितीय रजतपदक, श्री. तेजस कांबळे यास पाश्चिमात्य गायनासाठी प्रथम सुवर्णपदक तर गोद्रा ह्या एकांकिकेस प्रथम सुवर्णपदक पारितोषिक सिने अभिनेत्री गिरीजा प्रभु यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख होते.
इंद्रधनुष्य 2024 या सांस्कृतिक स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील कृषि व अकृषी मिळून एकुण 24 विद्यापीठातील 1500 विद्यार्थी कलाकार सहभागी झाले होते. यात नृत्य, अभिनय, संगीत, ललित कला व साहित्य या विविध कलाप्रकाराचे सादरीकरण करण्यात आले. या विविध कलाप्रकारांमध्ये सहभागी होण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील व अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. महावीरसिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली 45 विद्यार्थी कलाकारांसह 8 सहकलाकार दिग्दर्शक, नृत्य निर्देशक, संघ व्यवस्थापक व इतर कर्मचार्यांचा समावेश होता. यात सर्वश्री सागर गावंड, ऋतीराज रास्ते, प्रा दिपाली वाघ, आकाश साळवे, चांगदेव दातीर व बापूसाहेब गवते, श्रीमती अर्चना टकले, ॠषी कदम व सागर नन्नावरे यांनी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. या यशस्वी विद्यार्थी कलाकारांसह डॉ. महावीरसिंग चौहान यांचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संचालक संशोधन डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्षनाथ ससाणे व कुलसचिव डॉ. मुकूंद शिंदे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.