राहुरी कृषि विद्यापीठात आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धा संपन्न
राहुरी विद्यापीठ, दि. २९ ऑक्टोबर, २०२४ महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने विद्यापीठातील क्रीडा भवनात या आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मैदानी स्पर्धांचा समारोप प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार होते. याप्रसंगी कार्यक्रमासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सचिन नलावडे, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी, पदव्युत्तर महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण निर्देशक डॉ. बाबासाहेब भिंगारदे, एनसीसीचे अधिकारी डॉ. सुनील फुलसावंगे व डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव तथा शारीरिक शिक्षण निदेशक श्री. वैभव बारटक्के उपस्थित होते.
दि. २७ व २८ ऑक्टोबर या दोन दिवस झालेल्या या मैदानी स्पर्धेमध्ये लांब उडी, उंच उडी, ट्रिपल जंप, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, धावणे व रीले इत्यादी क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचा समावेश होता. यावेळी या स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. याप्रसंगी डॉ. दिलीप पवार व डॉ. गोरक्ष ससाणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच मार्गदर्शन केले. या स्पर्धांमध्ये सांघिक विजेतेपद (मुली) प्रथम क्रमांक – कृषी महाविद्यालय, बारामती, द्वितीय क्रमांक – कृषी महाविद्यालय, पुणे तर तृतीय क्रमांक- नारायणगाव येथील कृषी व्यवस्थापन महाविद्यालयाला मिळाला. सांघिक विजेतेपद (मुले) यामध्ये प्रथम क्रमांक -कृषी महाविद्यालय, पुणे, द्वितीय क्रमांक – कृषी महाविद्यालय, बारामती तर तृतीय क्रमांक – लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाला मिळाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विक्रम कड यांनी तर आभार श्री. वैभव बारटक्के यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.