जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची राहुरी येथे भेट
अहिल्यानगर दि. २५- राहुरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी राहुरीला भेट दिली.
यावेळी त्यांनी मतदान यंत्रे ठेवण्यासाठी तयार केलेल्या सुरक्षा कक्षाचा व मतमोजणी स्थळाच्या नियोजनाचा आढावा घेतला. राहुरी विधानसभा मतदारसंघाकरिता रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयामध्ये सुरक्षा कक्ष तयार करण्यात आला असून मतमोजणीदेखील तेथेच होणार आहे.
मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, टपाली मतदानाची तयारी, मतदार नोंदणी, मतदान जनजागृती आदी विषयांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी सालीमठ यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे, तहसीलदार नामदेव पाटील, अपर पोलीस अधीक्षक कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, नायब तहसीलदार विशाल सदनापूर, सचिन औटी आदी उपस्थित होते.