काटेकोर शेती विकास केंद्रातर्फे हायड्रोपोनिक्स शेतीवरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
राहुरी विद्यापीठ, दि. 25 ऑक्टोबर, 2024 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील काटेकोर शेती विकास केंद्र, एनसीपीएएच, कृषि मंत्रालय आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आंबी, एमआयडीसी, तळेगाव येथील गोविंद ग्रीन हाऊस येथे हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये पुणे येथील महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक श्री. किसन मुळे, काटेकोर शेती विकास केंद्राचे प्रमुख संशोधक डॉ. सचिन डिंगरे, गोविंद ग्रीन हाऊस, पुणेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बाळासाहेब गाडेकर, एमंसीडीसी, पुणेचे मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी श्री. हेमंत जगताप उपस्थित होते.
यावेळी झालेल्या तांत्रिक मार्गदर्शनात श्री. किसन मुळे यांनी उपस्थित शेतकर्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून हायड्रोपोनिक्स शेतकर्यांच्या जीवनात कसे समाविष्ट होऊ शकते याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ सचिन डिंगरे यांनी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान, रासायनमुक्त भाजीपाला उत्पादन आणि तांत्रिक बाबींबद्दल मार्गदर्शन केले. श्री. हेमंत जगताप यांनी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचे विविध प्रकार याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. श्री. बाळासाहेब गाडेकर यांनी हायड्रोपोनिक्सच्या पद्धतींच्या प्रात्यक्षिकांद्वारे शेतकर्यांना मार्गदर्शन केले. श्री. अभिजित यांनी हायड्रोपोनिक्सच्या व्यावसायिक शक्यतांवर चर्चा केली.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्राने उत्साही वातावरण निर्माण केले आणि शेतकर्यांनी तंत्रज्ञानाबद्दलची उत्सुकता व्यक्त केली. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी 32 शेतकर्यांनी सहभाग नोंदविला.