कृषीराहुरी

महात्मा फुले कृषि विद्यापीठाला भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या अधिस्वीकृती मंडळाकडून “उत्कृष्ट” मानांकन

व्हिजन 24 न्यूज

महात्मा फुले कृषि विद्यापीठाला भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या अधिस्वीकृती मंडळाकडून “उत्कृष्ट” मानांकन

राहुरी विद्यापीठ, दि. 24 ऑक्टोबर, 2024 भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती मंडळाच्या नुकत्याच झालेल्या 37 व्या बैठकीमध्ये सन 2023 ते सन 2028 या पाच वर्षांसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाला अधिस्वीकृती मिळाली असून विद्यापीठास ‘ए’ ग्रेड/उत्कृष्ट मानांकन दिले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विद्यापीठास व त्या अंतर्गत येणार्या विविध महाविद्यालयांना पाच वर्षासाठी अधिस्वीकृतीसह ‘ए’ ग्रेड/उत्कृष्ट मानांकन प्राप्त झाले आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाला नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती मंडळाने दिलेल्या ‘ए’ ग्रेड मानांकन मिळाल्यामुळे मनस्वी आनंद होत आहे. विद्यापीठाचे अपुरे मनुष्यबळाच्या प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन हे मानांकन मिळाल्याचे मोठे समाधान आहे. कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण कार्य करणारे शिक्षक आणि शास्त्रज्ञ अभिनंदनास निश्चितच पात्र आहेत.
डॉ. पी.जी. पाटील, कुलगुरु, मफुकृवि, राहुरी

याबरोबरच विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयातील बीएससी (कृषि), पदव्युत्तरच्या कृषि व संलग्न पदव्या, बी. टेक, एम. टेक व आचार्य या पदव्यांच्या विविध विषयांना व महाविद्यालयांना राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती मंडळाने अधिस्वीकृती दिली आहे. यामध्ये राहुरी येथील पदव्युत्तर महाविद्यालय, कृषि महाविद्यालय, पुणे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय, कोल्हापूर, कृषि महाविद्यालय, धुळे, राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, नंदुरबार यांचा समावेश आहे. हे मानांकन देताना राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती मंडळाने गठीत केलेल्या उच्चस्तरीय समितीने जून महिन्यात विद्यापीठ व विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली, यावेळी त्यांनी संबंधीत महाविद्यालयांच्या शैक्षणिक सुख सुविधा तसेच प्रयोगशाळांची पाहणी करुन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. याप्रसंगी संबंधीत महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी या समितीसमोर सादरीकरण केले होते. या समितीने महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या अधिनस्त असलेल्या महाविद्यालयांचे विविध मुद्द्यांच्या आधारे सर्वेक्षण करुन मुल्यांकन केले. यामध्ये विद्यापीठस्तरीय तसेच महाविद्यालयांचे प्रशासन, विविध विषय शिकविणार्या प्राध्यापकांची संख्या, शैक्षणिक उपक्रम, शिक्षणासाठी असलेल्या विविध सुविधा यामध्ये प्रामुख्याने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना, विद्यार्थ्यांसाठी असणार्या भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांना संशोधनासाठी उपलब्ध केलेल्या सुविधा, विद्यार्थ्यांचे विविध परिक्षांमधील यश, त्यांना मिळालेली पारितोषिके, त्यांची विविध कंपन्यांमध्ये झालेली निवड व त्यांनी सुरू केलेले उद्योग यांचा समावेश आहे. या समितीने कृषि उद्योजक माजी विद्यार्थी तसेच प्रगतशील शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष सुसंवाद साधुन त्यांचा विद्यापीठाशी असलेला समन्वय जाणून घेतला.

अधिष्ठाता (कृषि) डॉ. दिलीप पवार, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कुलसचिव डॉ. मुकुंद शिंदे, नियंत्रक श्री. सदाशीव पाटील, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, नोडल अधिकारी डॉ. एम.आर. पाटील आणि अधिस्वीकृती मिळालेल्या कृषि व अभियांत्रिकी महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता यांनी या मानांकनासाठी विशेष योगदान दिले. या विशेष व बहुमोल मानांकनासाठी विद्यापीठातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे कुशल नेतृत्व व मार्गदर्शनाबद्दल अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
×