महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे 18 वाण देश पातळीवर प्रसारीत
राहुरी विद्यापीठ, दि. 23 ऑक्टोबर, 2024 महात्मा फुले कृषि विद्यापीठाने संशोधीत केलेले विविध पिकांचे 18 वाणांना नवी दिल्ली येथील कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रसिध्द केलेल्या भारत सरकारच्या गॅझेटमध्ये अधिसुचीत करण्यात आली आहेत. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाला यश प्राप्त झाले आहे. राज्यातील कृषि विद्यापीठांपैकी या कृषि विद्यापीठाचे राष्ट्रीय पातळीवर सर्वात जास्त वाण प्रसारीत झाले आहेत. अधिसुचनेमध्ये प्रसारीत केलेली पिके व त्यांचे वाण पुढीलप्रमाणे भात-फुले कोलम, मका-फुले उमेद व फुले चॅम्पीयन, ज्वारी-फुले पुर्वा, करडई-फुले भुमी, तूर-फुले पल्लवी, मुग-फुले सुवर्ण, उडीद-फुले राजन, राजमा-फुले विराज, ऊस-फुले 15012, घेवडा-फुले श्रावणी, गहु-फुले अनुराग, कापुस-फुले शुभ्रा, टोमॅटो-फुले केसरी, चेरी टोमॅटो-फुले जयश्री, घोसाळे-फुले कोमल, वाल-फुले सुवर्ण व मेथी-फुले कस्तुरी. केंद्राने अधिसुचीत केलेल्या यादीमध्ये सदरच्या वाणांचा समावेश झाल्यामुळे महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये होत असलेल्या संशोधनाची दखल देश पातळीवर घेण्यात आली आहे.
सन 2024 या वर्षी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे सर्वात जास्त वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारीत झाली आहेत. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या दृष्टीने ही फार मोठी गौरवाची बाब आहे. विद्यापीठाचे शास्त्रज्ञ प्रामाणिकपणे काम करत असून शेतकरीभिमुख संशोधन करीत आहेत. डॉ. पी.जी. पाटील, कुलगुरु, मफुकृवि, राहुरी
यावेळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आणि संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.