कृषि विद्यापीठ कर्मचार्यांचा विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनाविरोधात मुक मोर्चा
राहुरी विद्यापीठ, दि. 23 सप्टेंबर, 2024 रोजी विद्रोही विद्यार्थी संघटनेतर्फे विद्यापीठाच्या गेटवर आंदोलन केल्यानंतर विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, शिक्षकेतर कर्मचारी, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र येवून विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या विरोधात मुक मोर्चा काढून कुलगुरु व विद्यापीठाला समर्थन दिले. यावेळी विद्यापीठाच्या कर्मचार्यांनी विद्यापीठाचे कुलसचिव यांना सदर विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या आदोनलाचा जाहीर निषेध करत असल्याबाबतचे निवेदन दिले. विद्यापीठाबद्दल अशीच बदनामी चालु ठेवली तर विद्यापीठातील विद्यार्थी व कर्मचारी निश्चितच आक्रमक भूमिका घेतील असे कुलसचिव यांना निवेदन देतांना सूचित करण्यात आले. कुलसचिवांना निवेदन देतांना विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. संजय कोळसे उपस्थित होते.
मागील काही महिन्यांपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठाविषयी तसेच विद्यापीठाच्या कुलगुरूंविषयी नकारात्मक अफवा समाजामध्ये पसरावल्या जात आहेत. यामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलीन होत आहे. नुकतेच विद्रोही विद्यार्थी संघटना यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्यापीठाबद्दल व कुलगुरुंबद्दल चुकीचे भाष्य केलेले आहे. तसेच सोमवारी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करून विद्यापीठाबद्दल आणि कुलगुरुंबंद्दल प्रक्षोभक भाषणे केली. विद्यापीठात सध्या अल्पशा मनुष्यबळ असताना सुद्धा सन्माननीय कुलगुरु डॉ. पी जी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील विद्यार्थी, कर्मचारी व प्राध्यापक अहोरात्र कष्ट करून विद्यापीठाच्या नावलौकिकात भर टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. डॉ. पाटील साहेबांच्या रूपाने विद्यापीठाला निश्चितच एक खंबीर नेतृत्व मिळालेले आहे. परंतु काही लोकांच्या अपप्रचारामुळे विद्यापीठातील कर्मचार्यांचे व विद्यार्थ्यांचे मनोबल घसरत असून त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षण व संशोधन कार्यावर होत आहे.