अपयश हीच यशाची पहिली पायरी-सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे
राहुरी विद्यापीठ, दि. 20 सप्टेंबर, 2024 व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये विजेत्या संघांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. कठोर मेहनत घेतल्यामुळे ते विजेते ठरले. या स्पर्धेत ज्यांना अपयश आले त्यांनी पुढील स्पर्धेची चांगली तयारी करावी. अपयश आल्यामुळे खचुन न जाता पुन्हा नव्या जोमाने तयारी केल्यास यश नक्कीच मिळेल. अपयश हीच यशाची पहिली पायरी असल्याचे प्रतिपादन पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील क्रीडा भवनात दोन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. साताप्पा खरबडे बोलत होते. यावेळी विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. विजू अमोलिक, विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. महाविरसिंग चौहान, पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विजय पाटील, माजी क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड, विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी, पदव्युत्तर महाविद्यालयाचे क्रीडा अधिकारी डॉ. बाबासाहेब भिंगारदे, स्पर्धेचे पंच प्रा. आदिनाथ कोल्हे उपस्थित होते.
या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये मुलांच्या संघात कृषि महाविद्यालय, सोनईने प्रथम,कृषि महाविद्यालय, बारामती द्वितीय तर कृषि महाविद्यालय के.के. वाघच्या संघाने तृतीय क्रमांक पठकावला. मुलींच्या संघामध्ये कृषि महाविद्यालय, बारामतीने प्रथम, कृषि महाविद्यालय, पुणेच्या संघाने द्वितीय तर कृषि महाविद्यालय, सोनईच्या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. या आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये 37 कृषि महाविद्यालयातील मुलांचे 35 संघ व मुलींचे 22 संघ सहभागी झाले होते. यामध्ये 55 शिक्षकांसह 420 मुले तर 260 मुलींनी सहभाग नोंदविला.
यावेळी प्रा. आदिनाथ कोल्हे, डॉ. अभिजीत नलावडे, प्रा. किशोर अंदुरे, प्रा. बी.डी. अदलींगे व प्रा. मगदुम या स्पर्धेतील पंच तसेच संघ व्यवस्थापकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. विजू अमोलिक यांनी मानले. याप्रसंगी सर्व सहभागी महाविद्यालयाचे संघ व्यवस्थापक, समित्यांचे सदस्य आणि विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.