राहुरी (व्हिजन 24 न्यूज) आपल्या विविध मागण्या मंजूर करून घेण्यासाठी महाराष्ट्रातील तब्बल एक लाख दिव्यांगांचे वादळ ९ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली.
प्रहार संघटनेचे संस्थापक तथा दिव्यांग मंत्रालय प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ९ ऑगस्ट रोजी एक लाख दिव्यांगांचा अति विराट आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दिव्यांगांना सहा हजार रुपये मासिक मानधन मिळावे, सरसकट घरकुल मिळावे, दिव्यांगांची नोकर भरती करण्यात यावी, राजकीय आरक्षण मिळावे, व्यवसायासाठी जागा आणि बिनव्याजी कर्ज मिळावे, अपंग वित्त महामंडळ व बीज भांडवल कर्जमाफी मिळावी या मागण्यांसह इतर मागण्यांसाठी सदरील आंदोलन छेडण्यात आल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातून दुपारी बारा वाजता मोर्चाला सुरुवात होणार असून हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे.
या दिव्यांग आक्रोश मोर्चामध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश मुंबई भागातील अंध मूकबधिर कर्णबधिर बहु विकलांग असे सर्वच प्रकारचे दिव्यांग महिला पुरुष सहभागी होणार आहेत. दिव्यांगांच्या अस्तित्वाची व न्याय हक्काची ही आरपारची लढाई असून या अति विराट मोर्चात राज्यातील सर्व दिव्यांगांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष उत्तर अहिल्यानगर तथा संस्थापक अध्यक्ष दिव्यांग शक्ती सेवा संस्था यांनी केले आहे.