शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञान गरजेचे- मा. आ. सौ. माहेश्वरी वाले
राहुरी विद्यापीठ, दि. 9 जुलै, 2024 डिजिटल तंत्रज्ञानामध्ये शेतीला अधिक उत्पादनक्षम, संसाधनाचा आणि वेळेचा अधिक कार्यक्षमतेने वापर करण्याची क्षमता आहे. आधुनिक शेतीसाठी नवनवे डिजिटल तंत्रज्ञान विकसित होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन गुलबर्गा कर्नाटकाच्या विधानसभेच्या सदस्य आ.सौ. माहेश्वरी वाले यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या आणि माजी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या अद्ययावत व काटेकर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञान प्रकल्पास भेट देतांना सौ. माहेश्वरी वाले बोलत होत्या. याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. मुकुंद शिंदे, कृषि यंत्रे व शक्ती अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सचिन नलावडे व प्रकल्पाचे सहप्रमुख अन्वेषक डॉ. सुनिल कदम उपस्थित होते.
यावेळी डॉ. मुकुंद शिंदे यांनी स्वयंचलित पंप प्रणाली, सेंसर आधारित सिंचन प्रणाली आणि आयोटी पार्कबद्दल माहिती दिली. डॉ. सचिन नलावडे यांनी ड्रोन आणि रोबोटिक्स प्रयोगशाळेबद्दल आणि आधुनिक तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली. हायपरस्पेक्टरल इमेजिंग प्रयोगशाळेविषयी आणि संशोधनाबद्दल माहिती डॉ. सुनिल कदम यांनी दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. विठ्ठल शिर्के यांनी स्वागत केले.