अहिल्यानगर

कांदा, दूधप्रश्नी शेतकर्‍यांचा आक्रोश; आंदोलक शेतकरी-पोलिसांमध्ये गोंधळ, जनावरे बांधली गेटवर…; कांदा, दुधाला भाव द्या अन्यथा दिल्लीत मोर्चा धडकणार- कोणी दिला इशारा पहा..

जिल्हा प्रतिनिधी / मधुकर केदार

कांदा, दूधप्रश्नी शेतकर्‍यांचा आक्रोश; आंदोलक शेतकरी-पोलिसांमध्ये गोंधळ, जनावरे बांधली गेटवर…; कांदा, दुधाला भाव द्या अन्यथा दिल्लीत मोर्चा धडकणार- कोणी दिला इशारा पहा..

खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्यावतीने शेतकरी जनआक्रोश आंदोलन

अहमदनगर: कांदा व दूधाला योग्य भाव मिळावा यामागणीसाठी खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन सुरू केले आहे. थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर जनावरे बांधत आंदोलन सुरू केले आहे. पाण्याच्या बॉटल इतकाही दर दुधाला नसल्याने दर द्या, नाही तर फुकट घ्या असा संताप यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला.

कांदा व दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नसाठी खासदार नीलेश लंके रस्त्यावर उतरले आहे. अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढाला. अहमदनगर महापालिकेसमोरून या मोर्चाला सुरूवात झाली. खासदार लंके यांनी थेट बैलगाडीचा दोर हातात घेत मोर्चाचे नेतृत्व केले.

या आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संदेश कार्ले, ठाकरे गटाचे संभाजी कदम, युवासेनेचे विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, प्रकाश पोटे, दत्ता जाधव, भगवान फुलसौंदर यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्याने सहभागी झाले होते. यावेळी मोर्चामध्ये शेतकर्‍यांनी राज्यसरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच दूधाला व कांदाला भाव देण्याची मागणी केली. दूध उत्पादक शेतकर्‍यांनी थेट गाय, म्हैस आणत या आंदोलनात सहभाग घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा येताच पोलिसांनी आंदोलकाना अडवले. यावेळी आंदोलक शेतकरी व पोलिसांमध्ये गोंधळ देखील उडला होता. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर शेतकर्‍यांनी दणाणून सोडला.

दरम्यान यावेळी पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर आंदोलक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी थेट जनावरे जिल्हाधिकार्‍यांच्या गेटवर बांधली. त्यानंतर उपस्थित असलेल्या अधिकार्‍यांना शेतकर्‍यांच्या दूधाचे वाटप यावेळी आंदोलकांनी केले. दरम्यान यावेळी आंदोलकांनी गायीच्या दुधाला प्रति लिटर ४५ रुपये तर म्हशीच्या दुधाला ७० रुपये दर द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात येत होती. यावेळी सध्या दुधाला मिळणार्‍या भावामध्ये दुध उत्पादक शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही त्यातून निघत नसल्याने शेतकरी मेताकुटीला आलेला आहे. सरकारने दुधाला अनुदान देण्याची घोषणा केली खरी परंतू अनुदानाच्या जाचक अटी व शर्तींमुळे शेतकर्‍यांना त्याचा लाभ होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात येत होता. दरम्यान यावेळी पोलिस प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. शुक्रवारी दुपारी उशीरा पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालया समोर हे आंदोलन सुरू होते.

मागण्या मान्य न झाल्यास दिल्लीत मोर्चा ः राजेंद्र फाळके

शेतकर्‍यांच्या दुधाला कवडीमोल बाजार मिळत आहे. याकडे राज्य व केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. या सरकारला शेतकर्‍यांचे काहीही देणे घेणे नाही. राज्यातील अभद्र सरकारने अधिवेशनात दुधाला ३० रुपये भाव ५ रुपये अनुदान जाहीर केले आहे. परंतु, १५ ऑगस्टनंतर केव्हाही विधानसभा निवडणुकीची आचासंहिता लागू शकते. दुधाला ४० रुपये हमीभाव पाच रुपये अनुदान देण्यात यावे. कांद्याचे भाव वाढले की निर्यात बंदी करायची असा प्रकार सरकारकडून केला जात आहे. कांद्याला आणि दुधाला रास्त भाव देण्यात यावा. शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य न झाल्यास दिल्लीत मोर्चा काढण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिला. या आंदोलनात महाविकास आघाडीचे ३१ खासदार उपस्थित राहतील असेही त्यांनी सांगितले.

ते’ शासनाचा पगार घेतात अन चाकरी घाटाखालच्यांची करतात

दुधाला रास्त भाव व कांद्याला हमी भाव मिळावा यासाठी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन केले. यावेळी शेतकर्‍यांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान कलेक्टर साहेब बाहेर या, बाहेर या… अशा घोषणा दिल्या. तसेच ते शासनाचा पगार घेतात अन चाकरी घाटाखाल्यांची करतात अशी मिश्किल टिपण्णीही यावेळी खा. नीलेश लंके यांनी केली.

जनावरे बांधली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात

कांदा व दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. तसेच गायी, म्हशी कार्यालयाच्या दारात बांधली. आंदोलनादरम्यान शेतकर्‍यांनी शेतकरी विरोधी घोषणाबाजी केली. तसेच मुक्या जनावरांनीही हंबरडा फोडला.

भिक नको, दुधाला भाव द्या

शेतकर्‍यांच्या दुधाला अन कांद्याला रास्त भाव द्या या मागणीसाठी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढला. यावेळी शेतकर्‍यांनी सरकार विरोधात संताप व्यक्त केला. तसेच आम्हाला भीक नको दुधाला, कांद्याला हमी भाव द्या अशा भावना व्यक्त केल्या. सरकार शेतकर्‍यांचे शोषण करत असल्याचा हल्लाबोल करत शेतकर्‍यांनी आक्रोश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
×