राहुरी : जमिनीवरील सरकारचे नाव कमी करण्यासाठी १ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी महसूल सहाय्यक सुनिल भागवत भवर यास अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ, पकडले. तलाठ्यास देण्यासाठी आरोपीने लाचेची मागणी केली असल्याचे पुढे आले आहे. १ जुलै रोजी राहुरी तहसिल कार्यालय येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपीविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत अॅन्टी करप्शनच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांची रामपूर येथे शेती आहे. शेतीचे क्षेत्र ३० आर इतके असून या क्षेत्रावरील सरकारचे नाव कमी करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, महसूल सहाय्यक सुनिल भागवत भवर याने तलाठ्याला देण्यासाठी २ हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १ हजार ५०० रुपये देण्याचे मान्य झाले. ही रक्कम स्विकारताना महसूल सहाय्यकास रंगेहाथ पकडले. पोलिस उपअधिक्षक प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. चंद्रकांत काळे, सचिन सुद्रिक, दशरथ लाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.