विधानसभा निवडणूक वार्तापञ लोकसभा निवडणूक निकालानंतर शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे वारे जोरात वाहू लागले आहेत. तसेच इच्छुकांच्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. शेवगावचे माजी आमदार घुलेबंधूचे पुढील राजकीय भवितव्य काय? असा सवाल व्यक्त होत असतानाच, माजी आमदार नरेंद्र घुले यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमात विद्यमान लोकप्रतिनिधीच्या कारभारावर टीका करून विकासासाठी हक्काचा माणूस विधानसभेत पाठवण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. मात्र उमेदवारी कोणाची अजित पवार की भाजप? की वेगळेच काही तरी, याची मतदारसंघात आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या मतदारसंघातून लोकसभेसाठी नीलेश लंके यांना चांगली मते मिळाली असून, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रतापकाका ढाकणे यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे प्रतापकाकादेखील यावेळेस पुन्हा एकदा मतदारसंघातून उभे राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तेव्हा यंदाची लढत तिरंगी होते की, चौरंगी याबाबतही राजकीय चर्चांना गावोगावी उधाण आलेले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काही महिने शांत राहिलेले माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपले राजकीय पत्ते उघड करून अखेर खासदार शरदचंद्र पवार यांच्या गटाला ऐनवेळी सोडचिठ्ठी देत, उपमुख्यमंत्री अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आम्ही सोबत येतोय पण आमच्या मताचे मूल्यमापन होईल का, असा सवाल श्री घुले यांनी व्यक्त केला होता. तसेच लोकसभेसाठी चंद्रशेखर घुले यांनी महायुतीच्या उमेदवाराचा जोरदार प्रचारदेखील केला होता. मात्र त्यांचे बंधू माजी आमदार नरेंद्र घुले, युवा सभापती डॉ. क्षीतिज घुले हे मात्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून थोडे अलिप्त राहिल्याचे दिसून आले. मात्र लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नीलेश लंके यांनी बाजी मारली. तर महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना अल्पमतांनी पराभव पत्करावा लागला. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने शेवगाव-पाथर्डी मतदरसंघात इच्छुक असलेले भाजपकडून पुन्हा आमदार मोनिका राजळे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून प्रतापराव ढाकणे, तर माजी आमदार चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्यासह ओबीसीनेते दिलीपराव खेडकर, भाजपचे गोकुळ दौंड, अरुण मुंडे यांनी निवडणूक लढविण्यासाठी राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना डावलून भाजप हा अजित पवार गटाला जागा सोडणार का? तसेच भाजपच्या गटबाजीतून दौंड – मुंडे उमेदवारी मिळण्यासाठी यशस्वी होतील का? असा यक्ष प्रश्न उपस्थित होऊन त्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच, माजी आ नरेंद्र घुले यांनी अभीष्टचिंतन सोहळ्यात कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढण्याचे जाहीर केल्याने आता उमेदवारी नेमकी कोणाची? अशी मतदारसंघात चर्चा सुरू आहे. माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची आक्रमक शैली ही सर्वश्रुत असल्याने त्यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेचा अंदाज लागणे कठीण झाले आहे. तसेच घुलेबंधूंनी सातत्याने शरदचंद्र पवार यांना समर्थन दिले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे घुलेबंधुंसोबतचे नातेसंबंध सर्वश्रुत आहे. त्यामुळे घुलेबंधू ऐनवेळी कोणती राजकीय चूल मांडतात त्या भूमिकडे सर्वांचे लागून आहे.
शरद पवारांची भिस्त प्रतापकाकांवर…
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात भाजपला मिळालेला साडेसात हजाराचा लीड पाहता, भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांची जमेची बाजू होऊन उमेदवारी निश्चित मानली जात आहे. परंतु भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा काही फटका बसतोय का? तसेच शरदचंद्र पवार गटाचे प्रतापराव ढाकणे यांनी अनेक वर्षापासून विधानसभेची तयारी सुरू केली असतानाच, लोकसभेत खासदार नीलेश लंके यांची एकाएकी खिंड लढवली गेल्याने त्यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तसेच माजी आमदार घुले यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने घुलेबंधूंच्या डोक्यात नेमक चाललंय तरी काय? अजित दादा, का भाजप? पुन्हा शरद पवार? की अजून काही वेगळेच? याची मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. घुले निवडणूक रिंगणात उतरल्यास इच्छुकांची संख्या वाढून तूल्यबळ बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी काही महिने वाट पाहावी लागेल, हे तितकेच खरे ठरणार आहे. त्यासाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे.
अजित पवारांकडे शेवगावसाठी घुलेंचा अग्रह!
शेवगावची जागा कोणत्याही परिस्थितीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसला प्राधान्याने मिळावी, अशी पक्षश्रेष्ठीकडे घुलेबंधुंनी जोरदार मागणी करून प्रबळ दावा करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. परंतु भविष्यकाळात पक्षश्रेष्ठी ऐनवेळी काय निर्णय घेणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष केंद्रित झाले आहे.