संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीच्या बैठकीमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे सर्वात जास्त वाण, तंत्रज्ञान शिफारशी व यंत्रे यांना मान्यता
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे सहा वाण, पाच कृषि यंत्रे, आणि ८९ कृषि तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता
राहुरी विद्यापीठ : महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि राज्यातील चारही कृषि विद्यापीठे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे तीन दिवसीय संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची 52 वी बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या समारोप प्रसंगी अध्यक्ष म्हणून महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील तसेच सहअध्यक्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख आणि दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे उपस्थित होते. यावेळी कृषि परिषदेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य श्री विनायक काशीद उपस्थित होते. याप्रसंगी चारही कृषि विद्यापीठांचे संचालक उपस्थीत होते.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांनी या वर्षी शेतकर्यांसाठी विविध पिकांचे सहा वाण, पाच कृषि यंत्रे-अवजारे आणि ८९ कृषि तंत्रज्ञान शिफारशी प्रसारीत करण्यात आल्या आहे. या वाणांमुळे व तंत्रज्ञान शिफारशींमुळे पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल व नवीन यंत्र व अवजारांमुळे शेतकर्यांचे श्रम कमी होतील.– कुलगुरू डॉ पी. जी. पाटील
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि संचालक संशोधन डॉ. सुनील गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतपिके वाण प्रसारण व शेतपिके वाण संरक्षण आणि शेतकरी अधिकारी कायद्यांतर्गत या कृषि विद्यापीठाच्या नवीन वाण आणि तंत्रज्ञान शिफारशी सादर केल्या व त्यास समितीने मान्यता दिली. या बैठकीत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे सहा वाण, पाच कृषि यंत्रे अवजारे, ८९ पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशी आणि दोन जैवीक व अजैवीक ताण सहन करणारे स्त्रोतांना मान्यता देण्यात आली. यामध्ये भात (व्ही.डी.एन.-१८०८), ऊस-फुले ऊस १५००६ (एम.एस.१६०८१), दुधी भोपळा – फुले गौरव (आर.एच.आर.बी.जी.-५४), दोडका – फुले किरण (आर.एच.आर.आर.जी.एच.-), कांदा – फुले स्वामी (आर.एच.आर.ओ.आर.-१२), टोमॅटो – फुले सूर्या (आर.एच.आर.टी.एच.- ३x५) हे वाण प्रसारीत करण्यात आले. तसेच फुले भेंडी प्लकर, फुले मका कणीस सोलणी व दाणे काढणी यंत्र, फुले अंजीर प्लकर, फुले पोर्टेबल हायड्रॉलीक जनावरे उचलण्याचे यंत्र व फुले गुळ घोटणी यंत्र प्रसारीत करण्यात आले असल्याची माहिती महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी दिली.
प्रसारीत वाण १. भात – (व्हीडीएन-१८०८)*: भाताचा व्हीडीएन -1808 हा अधिक धान्य उत्पादन देणारा, गरवा व लांबट बारीक दाण्याचा वाण पश्चिम महाराष्ट्रात खरीप हंगामात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला.
२. ऊस – फुले ऊस १५००६ (एम एस 16081): फुले १५००६ हा अधिक ऊस व साखर उत्पादन देणारा, मध्यम कालावधीत पक्व होणारा व न लोळणारा वाण महाराष्ट्र राज्यात सुरु, पूर्व हंगाम आणि आडसाली लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला.
३. दुधी भोपळा – फुले गौरव (आर.एच.आर.बी.जी.-५४): दुधी भोपळ्याचा फुले गौरव (आर. एच. आर. बी. जी. -५४) हा दंडगोलाकार, हिरव्या रंगाची फळे असणारा आणि अधिक उत्पादन देणारा वाण महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला.
४. दोडका-फुले किरण (आर.एच.आर.आर.जी.एच.-३): दोडक्याचा फुले किरण (आर. एच. आर. आर. जी. एच. -३) हा सरळ, कोवळी हिरवी फळे असणारा आणि अधिक उत्पादन देणारा संकरीत वाण महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला.
५.कांदा-फुले स्वामी (आर.एच.आर.ओ.आर.-१२): कांद्याचा फुले स्वामी (आर. एच. आर. ओ.आर. -१२) आकर्षक फिक्कट लाल रंगाचा, गोलाकार, अधिक उत्पादन देणारा आणि साठवणुकीसाठी उत्तम असणारा वाण महाराष्ट्रातील रब्बी हंगामासाठी प्रसारित करण्यात आला.
६. टोमॅटो – फुले सूर्या (आर.एच.आर.टी.एच.- ३x५): संकरित टोमॅटोचा, फुले सूर्या (आर. एच. आर. टी. एच.-३x५) हा मध्यम वाढीचा, अंडाकृती, जाड सालीची टणक फळे, लायकोपिनचे चांगले प्रमाण असणारा आणि अधिक उत्पादन देणारा वाण महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आला.
प्रसारीत यंत्रे १. फुले भेंडी प्लकर: भेंडी तोडणीसाठी हस्तचलित फुले भेंडी प्लकर यंत्र प्रसारित करण्यात आले.
२. फुले मका कणीस सोलणी व दाणे काढणी यंत्र: मक्याची कणसे सोलूण दाणे वेगळे करण्यासाठी विद्युतमोटर चलित फुले मका कणीस सोलणी व दाणे काढणी यंत्र प्रसारित करण्यात आले.
३. फुले अंजीर प्लकर: अंजीर फळांची तोडणी करण्यासाठी मनुष्यचलित फुले अंजीर प्लकर यंत्र प्रसारित करण्यात आले.
४. फुले पोर्टेबल हायड्रॉलीक जनावरे उचलण्याचे यंत्र: आजारी जनावरांना सहजपणे उचलून उपचार करण्यासाठी फुले पोर्टेबल हायड्रॉलीक जनावरे उचलण्याचे यंत्र प्रसारित करण्यात आले.
५. फुले गुळ घोटणी यंत्र: गुळ बनवताना घोटणी करणे आणि गुळाच्या ढेपा बनविण्यासाठी विद्युत मोटर चलीत फुले गुळ घोटणी यंत्र प्रसारित करण्यात आले.