कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांची गणेशखिंड, पुणे येथील संशोधन केंद्रास भेट
राहुरी विद्यापीठ, दि. 4 एप्रिल, 2024
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी विभागीय कृषि संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे येथील विविध संशोधन प्रकल्पांना भेटी दिल्या. संशोधन केंद्रावरील रोपवाटिकेस भेट देऊन कामाची पाहणी केली व रोपवाटिकेत अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून यांत्रिकीकरण करणेबाबत संबधीतांना सूचना केल्या.
यावेळी त्यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या आदर्श रोपवाटिकेच्या प्रस्तावातील रु. 100 लाख अनुदानाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. कुलगुरु डॉ. पाटील यांनी माळी प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन त्याठिकाणी होत असलेल्या विकासकामांची पाहणी केली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर कुलगुरु डॉ. पाटील यांनी संशोधन केंद्रातील अ.भा.स. पुष्प सुधार प्रकल्प, भाजीपाला सुधार प्रकल्प, फळपिके संशोधन योजना या प्रकल्पांना भेट देऊन शास्त्रज्ञांसोबत चर्चा केली व शास्त्रज्ञांना संशोधनाबाबत योग्य ते मार्गदर्शन केले. फळपिके संशोधन योजनेच्या भेटीदरम्यान कुलगुरू डॉ. पाटील यांनी आय.आय.एच.आर., बंगळुरू येथून आणलेल्या अवाकॅडोच्या विविध जातीच्या रोपांची पाहणी करून यावरील संशोधनाबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी या संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर लागवड करण्यात येणार्या ड्रॅगन फ्रुटच्या विविध जातींची लागवड करणेबाबत सुचना दिल्या. केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. आर.डी. बनसोड यांनी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कुलगुरू डॉ. पाटील यांनी संशोधन केंद्रावरील प्रत्येक शास्त्रज्ञांच्या कामाच्या स्वरूपाची माहिती घेऊन योग्य ते मार्गदर्शन केले. याप्रसंगी संशोधन केंद्रावरील ज्या कर्मचार्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ झालेला आहे त्या सर्वांनी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांचे आभार मानले.
यावेळी अॅग्रोवन दैनिकाचे संपादक श्री. आदिनाथ चव्हाण व त्यांचे सहकारी यांच्या समवेत कुलगुरुंनी पाणी परिषदेबाबत तांत्रिक चर्चा केली. याप्रसंगी कुलगुरुंनी विभागीय कृषि संशोधन केंद्रावरील विविध संशोधनाची व विकास कामांची माहिती दिली व श्री. आदिनाथ चव्हाण यांना जैवविविधता वारसा क्षेत्रावर आधारित पुस्तक भेट दिले. यावेळी वनस्पतीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. डी.बी. लाड यांनी आभार मानले.