कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या प्रयत्नांमुळे कर्मचार्यांना आश्वासीत प्रगती योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू
व्हिजन 24 न्यूज
कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या प्रयत्नांमुळे कर्मचार्यांना आश्वासीत प्रगती योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू
राहुरी विद्यापीठ, दि. 26 फेब्रुवारी, 2024 महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या प्रयत्नातून 13 वर्ष प्रलंबीत असलेली आश्वासीत प्रगती योजना (12 व 24 वर्ष) विद्यापीठातील कर्मचार्यांना लागू करण्यात आली आहे. दि. 1 एप्रिल, 2010 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील क व ड वर्ग कर्मचार्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने दोन लाभांची (12 व 24 वर्ष) सुधारीत आश्वासीत प्रगती योजना लागू करण्यात आली होती. कृषि विद्यापीठातील क व ड वर्गातील कर्मचारी या लाभापासून आजपर्यंत वंचीत होते. गेल्या 13 वर्षापासून राज्यातील कृषि विद्यापीठांचे कर्मचारी आश्वासीत प्रगती योजना लागू करण्यासाठी मागणी करत होते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासन स्तरावर ही मागणी मांडण्यात आली व त्यावर शासनाने सकारात्मक निर्णय घेवून तसा शासन निर्णय पारीत केला आहे. या अनुषंगाने कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी क व ड वर्गाच्या कर्मचार्यांची बैठक घेवून आश्वासीत प्रगती योजना आजच्या तारखेपर्यंत सर्व कर्मचार्यांना लागू करण्यात येणार असल्याचे सांगितले. विद्यापीठातील खरे काम करणारे हे क व ड वर्गातील कर्मचारी असतात. या कष्टकरी कर्मचार्यांच्या हिताच्या निर्णयामुळे त्यांना प्रोत्साहन मिळून त्यांची कार्यक्षमता वाढेल. या योजनेचा लाभ महात्मा फुले कृषि विद्यापीठातील क व ड मधील जवळजवळ 1200 पेक्षा जास्त कर्मचार्यांना होणार असल्याचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी सांगितले.
या बैठकीला विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यातून क व ड वर्ग कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी कुलगुरु यांनी कर्मचार्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी कुलगुरुचा पदभार हाती घेतल्यापासून गेल्या तीन वर्षात कर्मचार्यांचे गेल्या 5 ते 10 वर्षापासून प्रलंबीत प्रश्न मार्गी लावले, कर्मचारी हितांचे निर्णय घेतले याबद्दल कर्मचार्यांनी समाधान व्यक्त केले. वर्ग क व ड कर्मचार्यांना त्यांच्या मागणीनुसार व त्यांच्या सोईनुसार बदल्या देण्यात आल्या. प्राध्यापकांची 10 वर्षापासून प्रलंबीत असलेली कारकिर्द प्रगती योजना लागू केली व त्याचा 70 प्राध्यापकांना फायदा झाला. कुलगुरुंच्या अभ्यासू वृत्तीमुळे आणि निर्णयक्षमतेमुळे प्राध्यापकांची कारकिर्द प्रगती योजना ही नियमीत सुरु झाली आहे. कुलगुरुंच्या या निर्णयांचे विद्यापीठामध्ये स्वागत होत आहे.
या बैठकीमध्ये कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी क व ड कर्मचार्यांबरोबर आस्थापूर्वक संवाद साधला व कर्मचार्यांच्या हिताला कुठेही बाधा पोहचणार नाही असे आश्वासन दिले. या निर्णयाने बर्याच कर्मचार्यांच्या डोळयांत आनंदाश्रू आले. सदर बैठकीमध्ये नियंत्रक श्री. सदाशीव पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, उप-कुलसचिव (प्रशासन) श्री. विजय पाटील, सहाय्यक कुलसचिव (प्रशासन) श्री. सुनिल आव्हाड, कार्यालय अधिक्षक (प्रशासन) श्री. वसंत अडसूरे, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्षनाथ शेटे उपस्थित होते. सदर बैठकीचे प्रास्ताविक श्री. गणेश मेहेत्रे यांनी केले तर आभार श्री. शेटे यांनी मानले.