महामार्ग क्रमांक ६१ ची दैना काही हटेना; रखडलेला पूरा होत नाही तोच पहिला खराब !!
अहमदनगर / प्रशांत बाफना
महामार्ग क्रमांक ६१ ची दैना काही हटेना; रखडलेला पूरा होत नाही तोच पहिला खराब !!
शेकडो आंदोलनं आणि सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रडत रखडत पूर्णत्वास गेलेल्या महामार्ग क्रमांक ६१ चे अहमदनगर ते भुते टाकळी दरम्यानचे काम आता कुठं पूर्ण होत नाही तोच चांदबिबी डोंगराच्या पायथ्यापासून अहमदनगरपर्यंत हा रस्ता कमालीचा खराब झाला आहे. तशीच अवस्था स्वर्गीय बाबुराव भापसे तलावावरील पुलापासून देवराईपर्यंत झाली आहे. इतकंच नाही तर नव्याने झालेलं कामही जागोजागी उखडायला लागलं आहे. यावरुनच या कामाच्या निकृष्टतेची कल्पना येते.
शेकडो प्रवाशांच्या बलिदानानंतर आणि हजारो प्रवाशांचे मणके खिळखिळे झाल्यानंतर आमदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या प्राणांतिक उपोषणामुळे या महामार्गाच्या कामाला गती मिळाली. त्यानंतरच या महामार्गाच्या रुंदीकरणात अधिग्रहित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या जमीनींचा मोबदला मिळवून देण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी झपाट्याने पावले उचलली. अखेर या महामार्गाचं अपूरं काम पुर्णत्वास गेलं खरं परंतु, तत्पुर्वी झालेलं काम पुर्वपदावर आल्यामुळे प्रवाशांच्या नशीबी पुन्हा आदळआपट आली आहे. तसेच नव्याने झालेलं कामही अतिशय निकृष्ट असल्यामुळे ते जागोजागी परत उखडायला लागलं आहे. पाथर्डी शहर व तीसगांवात या महामार्गाच्या दुतर्फा बांधलेल्या गटारीही इतक्या अशास्त्रीय आहेत की या महामार्गावरील पावसाचे पाणी चुकूनही या गटारींत जाऊ शकत नाही. याउलट या गटारींमुळे बँक कॉलनीत जाण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे.
देवराई ते करंजीपर्यंत एका बाजूचा महामार्ग अजूनही बऱ्या अवस्थेत आहे तर दुसऱ्या बाजूचा उचकटला आहे. त्यामुळे, एका बाजूला डांबर कमी वापरल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येते. याशिवाय येणारी आणि जाणारी वाहने बऱ्या अवस्थेतील रस्त्यावरुन धावत असल्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे. अशी अवस्था असताना करंजीच्या घाटमाथ्यावर, टोलनाका मात्र दिमाखात उभारला आहे. प्रवासाच्या शिणवट्यात ही भर पडल्याने प्रवाशांच्या नशीबी प्रवासाचं सुख मात्र नक्कीच नाही. त्यामुळे, निकृष्ट का होईना परंतु अर्ध्या महामार्गाचं काम झालं म्हणून समाधान होतं ना होतं तोच अर्धा महामार्ग उखडला गेल्यामुळे प्रवाशांना परत यमयातना भोगाव्या लागत आहेत. एकंदरीत ‘आजा मेला अन् नातू झाला.’ अशी म्हण प्रचलित असली तरी येथे मात्र नातू झाला आणि आजा मरणासन्न अवस्थेत आहे. गतीमान सरकारच्या काळात निदान महामार्ग क्रमांक ६१ ची तरी गती नक्कीच मंदावली आहे.