सरपंच संघटनेवरून कुंडलिक खांडे-धनंजय गुंदेकर यांच्यामध्ये रसीखेच?
खांडेंनी ठोकलाय विधानसभेसाठी हाबुक तर धनंजय गुंदेकरांना फिरवायचाय भ्रष्टाचारावर आसूड! सरपंच,उपसरपंचांना पडलाय प्रश्न,कोणता झेंडा घेऊ हाती?
सरपंच संघटनेवरून कुंडलिक खांडे-धनंजय गुंदेकर यांच्यामध्ये रसीखेच?
खांडेंनी ठोकलाय विधानसभेसाठी हाबुक तर धनंजय गुंदेकरांना फिरवायचाय भ्रष्टाचारावर आसूड!
सरपंच,उपसरपंचांना पडलाय प्रश्न,कोणता झेंडा घेऊ हाती?
अहमदनगर / प्रतिनिधी प्रशांत बाफना
काल – परवा बीड तालुक्यात सरपंच संघटनेवरून दोन ध्रुव दिसले. त्याला कारण ही तसेच आहे. एक शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडीलक खांडे तर दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य धनंजय गुंदेकर. या दोघांमध्ये सध्या रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे. परंतु, खांडे यांनी बीड विधानसभेसाठी हाबुक ठोकून तयारी दर्शीवली असतांना गुंदेकरांनी मात्र संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचारावर आसूड फिरवायचा असे म्हणत यातील काळेबेरे विधानसभेपुर्वी उघड करणार असल्याचे ठणकावले आहे. एकंदरीत सरपंच उपसरपंच आणि भ्रष्टाचाराने बीड मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण ढवळणार असले तरी सध्या तरी सरपंच, उपसरपंचांना कोणता झेंडा घेऊ हाती? असाच प्रश्न पडला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दोन दिवसांपूर्वी अचानक पत्रकार परिषद घेत सरपंच, उपसरपंच संघटनेची घोषणा करत संघटनेच्या जिल्हा प्रमुखांसह अन्य पदाधिकार्यांची निवड केली तर दुसरीकडे ग्रामसत्ता सरपंच- उपसरपंच ग्रामपंचायत संघटनाचे संस्थापक अध्यक्ष धनंजय गुंदेकर यांनीही 40 ते 50 सरपंच, उपसरपंच व कार्यकर्ते जमा करत शासकीय विश्रामगृह येथे ग्रामसत्ता सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत संघटनेची बैठक बोलावून जिल्हाध्यक्ष व इतर कार्यकारणी जाहीर केली. संघटनेच्या कार्यकारिणीत सर्वपक्षीय सरपंच, उपसरपंचांना संधी देण्यात आली. सामाजिक प्रसार माध्यमांवर ही बाब वार्यासारखी पसरली आणि चर्चा सुरु झाली सरपंच संघटनेवरून कुंडलिक खांडे आणि धनंजय गुंदेकर यांच्यामध्ये लागलेल्या स्पर्धेची. परंतु अनेक दिवसाचे राजकारणी असलेले कुंडलिक खांडे यांनी दोन वेळा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद भुषविले असून शिवसेना शिंदे गटाचे ते जिल्हाप्रमुख आहेत. त्यामुळे तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात त्यांचा दांडगा संपर्क असून गेल्या काही वर्षां पासून सरपंच, उपसरपंच यांच्या आडी-अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी खांडे कार्य करत आहेत. त्यामुळे अनेक सरपंच, उपसरपंच त्यांच्याकडे येवू शकतात. परंतु धनंजय गुंदेकर हा युवकाचा हृदय स्थान असलेला युवा नेता असून काही दिवसापूर्वी त्यांनी तलाठी भरतीसाठी केलेल्या आंदोलनामुळे त्यांना जेलची वारी करावी लागली होती. कायम लोकहितासाठी आंदोलन करणारा युवा नेता म्हणून गुंदेकर यांच्याकडे पाहिले जात असून अनेक युवा सरपंच, उपसरपंच त्यांच्या सोबत आहेत. शिवाय ज्येष्ठ सरपंच, उपसरपंच, सदस्य देखील युवा संस्थापक अध्यक्ष ग्रामसत्ता सरपंच उपसरपंच संघटनेशी अंतर्गत जोडल्याचे दिसते.
शिवसेना जिल्हाप्रमुख असलेले कुंडलिक खांडे हे 20 वर्षांपासून त्यांच्या ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चव्य निर्माण करून आहेत, तसेच पंचायत समितीच्या सदस्यपदी त्यांच्या पत्नी देखील होत्या. शिवसेनेत काम करताना जिल्हाभरात त्यांचा संपर्क निर्माण झालेला आहे. ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध ते करू शकतात या कारणांमुळे त्यांनी या संघटनेची स्थापना करत आगामी काळात होणार्या बीड विधानसभेच्या निवडणूकिसाठी देखील हाबुक ठोकला आहे.
मात्र दुसरीकडे धनंजय गुंदेकर यांनी म्हटले आहे की जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून हा भ्रष्टाचार कोणी-कोणी केला हे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जनतेसमोर मांडणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे ग्रामीण भागात त्यांच्या सोबत मोठ्या प्रमाणत युवा शक्ती जोडली गेली आहे.
दोन्हींच्या एकाचवेळी झालेल्या घोषणामुळे कोण कोणत्या संघटनेत जाते, कोण कुणाला पाठिंबा देते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र संख्येने गुंदेकरांनी बाजी मारली असली तरी ही संघटना ताकतीने चालवणे एवढे सोपे नाही. तूर्तास तालुक्यातील सरपंच , उपसरपंचांना कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न पडलेला आहे. परंतु,या परिस्थितीमध्ये सरपंच ,उपसरपंच यांनी गोंधळात न पडत सत्यवादी संघटनेची धुरा हाती घ्यावी का असा प्रश्न संरपंच उपसरपंच,सदस्यांना पडला आहे.