मदत करणे बेतले सचिन मंडलेचा यांच्या जीवावर
व्हिजन २४ न्यूज
अहमदनगर : – अहमदनगर- कल्याण महामार्गावर बस-ट्रॅक्टर व कार अशा तीन वाहनांच्या विचित्र अपघात झाला. त्यात टाकळी मानुर (ता. पाथर्डी येथील राहिवासी आणि शिरुर कासार येथे व्यवसायानिमित्त स्थायिक असलेल्या सचिन मंडलेचा या तरुण व्यवसायिकाचा अपघातात मृत्यू झाला. आधीच रस्त्यावर ऊसाची उलटलेली ट्राली मधील ऊस बाजुला करण्यासाठी मदत करणे सचिन च्या जीवावर बेतले आहे. ठाण्याकडून येणाऱ्या एसटीने सचिन च्या गाडीला धडक दिली आणि मदत करणाऱ्या सचिन ला जीव गमवावा लागला.
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी फाट्यावर काल (बुधवारी) ऊसाचा ट्रॅक्टर, चारचाकी वाहन आणि एसटी यांचा विचित्र अपघात झाला. त्यात ६ जण जागीच ठार झाले, तर ३ जण जखमी झाले आहेत. बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या दरम्यान नगर-कल्याण महामार्गावर भनगडेवाडी शिवारात ढवळपुरी फाट्यावर हा अपघात झाला. मयतांमध्ये २ पारनेर, ३ संगमनेर, तर पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानुरचे रहिवासी आणि शिरुर कासार (जि. बीड) येथे व्यवसायानिमित्त स्थायिक असलेले सचिन कांतीलाल मंडलेचा (वय ४०) यांचाही यात मृत्यू झाला.
नगर-कल्याण महामार्गावर भनगडेवाडी शिवारात ढवळपुरी फाट्यावर ऊसाने भरलेल्या उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर कल्याणवरून नगरकडे जाणारी ठाणे आगाराची बस (क्र. एम. एच.-२०, जी. सी.-४८२५) ही जोरदारपणे धडकली. यावेळी येथे एक ईको कार (एम. एच.-२३, बी. एच.-५२५५) सुद्धा उभी होती. तिलाही धडक बसली.
अपघातग्रस्त ट्रॅक्टरची ऊसाने भरलेली ट्रॉली उलटल्याने त्यामधील ऊस रस्त्यावर पडला होता. एका जेसीबीच्या साह्याने ट्रॉली सरळ करीत ऊस भरण्याचे कामही सुरू केले होते. त्यावेळी अंधार असल्याने तेथून जाणाऱ्या कारचा चालक सचिन मंडलेचा यांनी गाडीचे लाईट सुरू ठेवून तेथे मदतीसाठी थांबले होते. त्याचवेळी कल्याणवरून आलेल्या बसने या ट्रॅक्टर ट्रॉलीसह कारला जोराची धडक दिली. मंडलेचा यांनी केलेली मदत त्यांच्याच अंगलट आली. या अपघातात तेही मयत झाले.
शिरुर कासार शहरात सचिन अनेक वर्षापासुन व्यवसायानिमित्त स्थायिक आहेत. दुसऱ्या व्यक्तीला मदत करणे हा सचिन मंडलेचा यांचा कायम स्थायीभाव त्याच भावनेतून सचिन काल मदत करत होेते. ठाण्यातून परत येताना करत असलेली मदत सचिनच्या जीवावर बेतली आहे. या अपघातात निलेश रावसाहेब भोर (वय २५, रा. देसवडे, ता. पारनेर), जयवंत रामभाऊ पारधी (वय ४५) संतोष लक्ष्मण पारधी (वय ३५), अशोक चिमा केदार (वय ३५, सर्व रा. जांबूत, ता. संगमनेर), प्रकाश रावसाहेब थोरात (वय २४, रा. वारणवाडी, ता. पारनेर), कार चालक सचिन कांतीलाल मंडलेचा (वय ४०, रा. टाकळीमानूर, ता. पाथर्डी) हे मयत झाले. तर सुयोग अंबादास आडसूळ ( वय २५, रा. भनगडवाडी, ता. पारनेर), देवेंद्र गणपत वाडेकर (वय २७, रा. देसवडे, ता. पारनेर), बद्रिनाथ विठ्ठल जगताप (वय ४५, ग्रामसेवक, रा. लोणी, ता. शिरुर कासार, जि. बीड) हे जखमी झाले आहेत.