महसुल भवनामुळे प्रशासकीय यंत्रणेमध्ये विकेंद्रीकरण येऊन प्रशासन अधिक लोकाभिमुख होणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
नवीन महसुल भवनातुन नागरिकांची कामे अधिक जलदगतीने होतील
(व्हिजन २४ न्यूज)
अहमदनगर : दि. 14 ऑक्टोबर – जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्वसामान्य व्यक्तींचा महसुल विभागाशी सर्वाधिक संबंध येतो. नागरिकांना अत्यंत कमीवेळेत सेवांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा यासाठी महसुल भवनाच्या माध्यमातून सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यात येत आहेत. प्रशासकीय यंत्रणेमध्ये विकेंद्रीकरण येऊन प्रशासन अधिक लोकाभिमुख होऊन नवीन महसुल भवनातून नागरिकांची कामे अधिक गतीने होतील, असा विश्वास राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बाजुला 47 कोटी 86 लक्ष रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या महसुल भवन, अहमदनगर या नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपुजन पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते.
व्यासपीठावर महापौर रोहिणी शेंडगे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उप विभागीय अधिकारी सुधीर पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, महसुल विभागामध्ये एकसंघता येऊन जनतेची कामे वेगवान पद्धतीने व्हावीत, यासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेण्यात येत आहेत. महसुल विभागाच्या सेवा जनतेला कार्यालयात न येता अत्यंत कमी वेळात व सुलभतेने मिळाव्यात यासाठी महसुल विभागाच्या सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वन अम्ब्रेला ॲडमिनिस्ट्रेशनवर भर देण्यात येत असुन जिल्ह्याच्या विकास आराखड्यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला अशाच प्रकारचे महसुल भवनाच्या उभारणीसाठी नियोजन करण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पूर्वी जमीनीची मोजणी पारंपरिक पद्धतीने केली जात होती. जमीन मोजणीसाठी नागरिकांना अनेक दिवस प्रतिक्षा करावी लागत होती. परंतू आधुनिक तंत्रज्ञनाचा वापर करत रोव्हर मशिनने जमीनीची मोजणी अत्यंत कमी वेळेत करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्याच्या समतोल विकासाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात उद्योगांची उभारणी करण्यावर भर देण्यात येत आहे. औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी शासनाची पाचशे एकर जमीन औद्योगिक वसाहतीला वर्ग करण्यात आली आहे. येत्या काळात जिल्ह्यात अधिकाधिक उद्योगांची उभारणी होऊन जिल्ह्यातील बेरोजगाराच्या हाताला काम मिळावे यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचेही ते म्हणाले.
जिल्ह्यात अनेक धार्मिक, पर्यटन व साहसी पर्यटन स्थळे आहेत. या स्थळांचा विकास केल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. जिल्ह्यातील या स्थळांच्या विकास कामाला अधिक प्रमाणात गती देण्याच्या जिल्हा प्रशासनाला सुचना करत रोजगार निर्मितीला अधिक प्रमाणात चालना देण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगत आपला जिल्हा सर्वाधिक दूध उत्पादन करणारा जिल्हा आहे. जिल्ह्यासह राज्यातील पशुधन वाचविण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणी आहे अशा शेतकऱ्यांना चारानिर्मितीसाठी मोफत बियाणे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली असल्याचेही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने महसुल विभाग अधिक सक्षम करण्याबरोबरच जिल्ह्यातील विकास कामांना अधिक गती देण्यात येत आहे. अहमदनगर शहर व ग्रामीण भागासाठी यापूर्वी एकच तहसिल कार्यालय होते. परंतु नागरिकांची कामे वेळेत व्हावीत या उद्देशाने शहरी व ग्रामीण भागासाठी स्वतंत्र तहसिल कार्यालयाची निर्मिती करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, अत्यंत देखणी व सर्व सुविधांनीयुक्त अशी ही महसुल भवनाची इमारत उभारण्यात येत आहे. यातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांची कामे वेळेत होणार आहेत. येणाऱ्या काळात शहराच्या विकास कामांना अधिक प्रमाणात गती देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, महसुल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातुन महसुल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शी व गतीमान करण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात महसुल सप्ताह राबविण्यात येऊन नागरिकांची अनेक कामे करण्यात आली. नागरिकांना वेळेत सेवा मिळाव्यात यासाठी ई-मोजणी, ई फेरफार, ई-पंचनामे आदी उपक्रम राबविण्यात येत असुन जिल्ह्यातील संपुर्ण महसुल विभागामध्ये ई-ऑफीस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. पालकमंत्री वॉररुमच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी गतीने करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, अहमदनगर शहर व ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची कामे या महसूल भवनाच्या एकाच छताखाली होणार आहेत. येत्या काळात 20 कोटी रुपये खर्चून सर्वसामान्यांची वाचनाची भूक भागावी यासाठी सुसज्ज अशा ग्रंथालयाचीही उभारणी करण्यात येणार आहे. सर्वांच्या सहकार्यातून अहमदनगर जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सर्वप्रथम पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विधिवत पुजन व कोनशिला अनावरण करुन नूतन इमारतीचे भूमीपुजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने तर सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.