कृषी

कृषी उद्योजकतेच्या आधारावर आपण जगावर राज्य करू – सचिव तथा महासंचालक डॉ .हिमांशू पाठक

सचिव भारत सरकार डॉ. हिमांशू पाठक यांच्या उपस्थितीत उद्योगन्मुख उद्योजकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

व्हिजन 24 न्यूज

राहुरी विद्यापीठ, दि. 23 ऑगस्ट, 2023 कृषि क्षेत्रातून देशाला 18 टक्के जी.डी.पी. मिळतो व राहिलेला 82 टक्के जी.डी.पी. हा इतर क्षेत्रातून मिळतो. या 18 टक्के जी.डी.पी. कृषि व कृषिवर अवलंबुन असलेल्या 50 टक्के लोकसंख्येतून मिळतो. या अनुषंगाने कृषि क्षेत्रात उद्योजकतेला मोठी संधी आहे. आपला देश अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण आहे. एखादे कृषि उत्पादनाची आपण निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतल्यावर त्याचे परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होतात व त्या कृषि उत्पादनाचे भाव गगनाला भिडतात. आपल्या देशाची कृषि परंपरा ही अकरा हजार वर्षापूर्वीची आहे. आपला कृषिचा पाया भक्कम आहे. त्यादृष्टीने आपला कृृषिचा पाया भक्कम असून त्याला नविन तंत्रज्ञान, कौशल्य आणि कृषि उद्योजकतेची साथ मिळाली तर कृषि उद्योजकतेच्या आधारावर आपण जगावर राज्य करु शकतो असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या कृषि संशोधन व शिक्षण विभागाचे सचिव आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील जागतिक बँक अर्थसहाय्यित राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्पाद्वारे उदयोन्मुख उद्योजकांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना सचिव तथा महासंचालक डॉ. हिमांशू पाठक बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील उपस्थित होते. यावेळी नाशिक येथील सुप्रसिद्ध उद्योजक सह्याद्री फार्मचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक इंजि. श्री. विलास शिंदे ऑनलाईन उपस्थित होते. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. सी.एस. पाटील, भा.कृ.अ.प.च्या राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के.के. पाल, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, डॉ. गोरक्ष ससाणे, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक श्री. सदाशिव पाटील उपस्थित होते.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील म्हणाले या कृषि विद्यापीठाने अनेक उद्योजक घडविले आहेत. यामध्ये श्री. विलास शिंदे सारखे कृषि उद्योजक वीस हजारच्यावर शेतकर्यांपर्यंत पोहचले आहेत. यशस्वी कृषि उद्योजक बनायचे असेल तर शेतीवरील निष्ठा, कर्तव्य दक्षता व अद्ययावत तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. शेतकर्यांना शेतीतून समृध्द करायचे असेल तर त्यांना शेतीमधील नविन विविधतेचे पर्याय देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कुलगुरु डॉ. पाटील यांनी केले. उद्योजक श्री विलास शिंदे मार्गदर्शन करताना म्हणाले जगातील तरुण वर्ग शेतीपासून दुर जात आहे. याचे कारण म्हणजे इतर क्षेत्रात सुरक्षीतता जास्त असून शेतीमध्ये सुरक्षीतता कमी आहे. यशस्वी कृषि उद्योजक तेव्हाच बनु शकतो जेव्हा आपत्तीला इष्टआपत्ती समजून त्यातून मार्ग काढतो.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नाहेप अंतर्गत कास्ट-कासम प्रकल्पाच्या नविन बांधण्यात आलेल्या कॉन्फरंन्स हॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले. मान्यवरांनी कास्ट-कासम प्रकल्पाच्या प्रक्षेत्राला भेट देऊन प्रकल्पाद्वारे विकसित केलेल्या डिजिटल लायसीमीटर उपकरणाची तसेच ड्रोनद्वारे औषध फवारणीची पाहणी केली. यावेळी मान्यवरांनी कास्ट-कासम प्रकल्पाच्या प्रयोगशाळेला भेट देवून कास्ट-कासम प्रकल्पाद्वारे विकसीत केलेले आय.ओ.टी. तंत्रज्ञान, रोबोटीक्स तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान जाणून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुकुंद शिंदे यांनी तर आभार डॉ. विठ्ठल शिर्के यांनी मानले. या कार्यशाळेमध्ये विविध उद्योजकांनी तांत्रिक सत्रामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केले. यामध्ये पुणे येथील रिव्हिलस इरिगेशन इंडिया प्रा.लि.च्या उद्योग संचालिका डॉ. संगीता लड्डा, पुणे येथील अॅग्री बिजनेस कन्सल्टंट श्री. भारत भोजने, नवी दिल्ली येथील जी.आय.झेड.चे वरिष्ठ सल्लागार डॉ. इंद्रनील घोष आणि पुणे येथील अॅग्रीनेक्ष्ट कन्सल्टंन्सीच्या संचालिका माधुरी घुगारी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि शेतकरी समक्ष आणि ऑनलाईन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
×