Ahmadnagar

नगरमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल सेवापुस्तकावर खोटी जन्मतारीख…

उपजिल्हाधिकाऱ्याचा प्रताप…!

व्हिजन 24 न्युज

अहमदनगर : सेवापुस्तकावर खोटी जन्मतारीख टाकून सुमारे चार वर्ष पाच महिने अवैध सेवा करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र. 15 (सध्या सेवानिवृत्त) भास्कर पंढरीनाथ ठोंबरे (रा. जालना रस्ता, सिडको, छत्रपती संभाजीनगर) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 18 जुलै) फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी उपजिल्हाधिकारी भूसंपादन कार्यालयातील महसूल सहाय्यक भाऊसाहेब विनायक वाघ (वय 39 रा. शिराढोण, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांच्याकडील 30 मे 2023 रोजीचा आदेश, तहसीलदार (महसूल) माधुरी आंधळे यांच्याकडील 26 मे 2023 रोजीचा आदेश तसेच उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांनी 8 जून 2023 रोजी दिलेल्या आदेशानुसार वाघ यांनी मंगळवारी (दि. 18) फिर्याद दिली आहे.

भास्कर पंढरीनाथ ठोंबरे हा उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. 15 या पदावर दि. 14 मे 2015 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नगर येथे हजर झाला होता. ठोंबरे याची खरी जन्मतारीख 12 मार्च 1953 अशी असल्याने विभागीय आयुक्त, नाशिक येथे झालेल्या प्राथमिक चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ठोंबरे याच्या सेवापुस्तकाच्या प्रथम पृष्ठावर त्याची जन्म तारीख 12 ऑगस्ट 1957 अशी नोंदवण्यात आलेली आहे. सदर बाब ठोंबरे याने संबंधित सक्षम प्राधिकार्‍याच्या निदर्शनास जाणून बुजून आणून दिली नाही. तसेच सदर विसंगतीमुळे सेवा पुस्तकाच्या प्रथम पृष्ठावर स्वाक्षरी करण्याचे ठोंबरे याने जाणीवपूर्वक टाळले.

त्याचबरोबर ठोंबरे हा त्याच्या खर्‍या जन्म तारखेप्रमाणे (12 मार्च 1953) दि. 31 मार्च 2011 रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणे अपेक्षित होते. परंतु ठोंबरे हा त्याच्या खोट्या जन्म तारखेप्रमाणे (12 ऑगस्ट 1957) दि. 31 ऑगस्ट 2015 रोजी शासकिय सेवेतूननिवृत्त झालेला आहे. याचाच अर्थ ठोंबरे याने त्याची खरी जन्म तारीख ज्ञात असताना देखील चार वर्षे पाच महिने अवैध सेवा करून शासनाची फसवणूक केली आहे. त्याअनुषंगाने भास्कर ठोंबरे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याबाबत पत्रान्वये विभागीय आयुक्त नाशिक यांनी कळविलेले आहे. त्यामुळे वाघ यांनी वरीष्ठांच्या आदेशाने तोफखाना पोलीस ठाण्यात भास्कर ठोंबरे याच्याविरूध्द फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
×